शुक्रवार, १९ जून, २०२०

"शिकणं कधी थांबत नाही",व्यंकटेश चौधरी


शिकणं कधी थांबत नाही
                                            (व्यंकटेश चौधरी)

           १५ जून. नेहमीप्रमाणे शाळा सुरू होण्याचा दिवस. चिमुकल्यांच्या हसण्या बागडण्याने शाळांच्या अंगणात पुन्हा चैतन्य भरण्याचा दिवस. मात्र कोरोना संकटामुळे ही चिमुकली पावले पुन्हा या शाळेच्या अंगणात कधी फिरतील आणि पुन्हा लेकरांसाठी वाट बघणार्‍या शाळा कधी बहरून येतील हे सांगता येत नाही, इतकं अनिश्चिततेचे वातावरण सध्या आहे. मला ठाऊक आहे, की आपण सारे जण आपल्या चिमुकल्यांच्या भेटीसाठी आतुर झालेले आहात आणि तेही तितकेच आपल्या आवडत्या शिक्षक शिक्षिका यांना पाहण्यासाठी भेटण्यासाठी, त्यांच्याकडून नवीन शिकण्यासाठी आतुर आहेत. मात्र या संकटातही आपणाला शिक्षण चालू ठेवायचे आहे. सुट्टी असूनही आपण सर्वांनी लर्निंग फ्रॉम होम या उपक्रमात आपल्या मुलांपर्यंत नाना माध्यमातून पोचलात, त्यांचे शिकणे चालू ठेवले याचा मोठा आनंद आणि अभिमान मला आहे. ज्यांनी अत्यंत निष्ठेने आणि सातत्याने हे काम केलं त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. 

मित्रहो,
          आता मात्र आजपासून लर्निंग फ्रॉम होम या उपक्रमात आपण सातत्य ठेवूया. कारण प्रत्यक्षात शाळा जरी भरली नाही तरी नवी पाठ्यपुस्तकं आलेली आहेत, ती आपणाला मुलांपर्यंत पोहोचवायची आहेत. ती कशी पोहोचवता येतील हे प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, सहकारी आणि गावातील शालेय व्यवस्थापन समिती यांनी फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून जसं शक्य होईल तसं ठरवावं आणि मुलांपर्यंत ही पाठ्यपुस्तके पोहोचवावीत. ज्यांना हे ही शक्य नाही,अशा शिक्षक बंधू-भगिनींनी ही सर्व पाठ्यपुस्तकं आता ऑनलाईन उपलब्ध आहेत, पीडीएफ स्वरूपात, किमान ती तरी आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवावीत. खरंतर शिकण्याचा आनंद हा वर्गात बसून, शिक्षकांच्या तोंडून या पाठाचे स्पष्टीकरण शिक्षकांच्या त्यांच्या स्वतंत्र अशा अभिव्यक्ती कौशल्यातून, त्या या पाठातील मूल्यं मुलांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं यासारखा खरा शिकण्याचा आणि शिकवण्याचा आनंद नाही. काय काय घडतं वर्गामध्ये? शंकांना लगेच उत्तरं मिळतात, चांगल्या उत्तराचं लगेच कौतुक होतं, शिक्षकांनाही आपण शिकवल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा पटापट आपली मुले देतात, तेव्हा एका निर्मिकाला सृजनाच्या साक्षात्काराचा आनंद होत असतो. आपण या साऱ्यापासूनच दूर जात आहोत. पण काही काळच. पण हा काहीकाळ जर दीर्घकाळ झाला तर मात्र आपलं काम कठीण होणार आहे, याची जाणीव असू द्या. कारण आज जरी शाळा उघडली नाही आणि प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन आपण सुरू करू शकलो नाही, तरीही दिलेले उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करावंच लागणार आहे आणि हे उद्दिष्ट पूर्ण करताना नंतर आपली दमछाक होणार आहे. म्हणजे एक काम म्हणून हे करायचं या दृष्टीनं मी हा उल्लेख केलेला नाही, तर एक बांधिलकी म्हणून त्या विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्यातलं शिकण्याचं जे काही वय आहे, जे दिवस आहेत, ते दिवस वाया जाऊ नयेत, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून किमान आपणाला या पद्धतीने करून का होईना त्याचं शिकणं चालू ठेवलं पाहिजे. मित्रहो, मी कुठेतरी वाचलं होतं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसं शिकवावं? तर आपल्या पोटच्या मुलांना त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनी जसं शिकवावं हे आपणाला वाटतं, तसं आपण आपल्या शाळेतल्या मुलांना शिकवावं.‌साधं सोपं गणित. मागच्या वेबिनार मध्ये मी आपणाला म्हणालो होतो, तसं ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना तुमच्याशिवाय कोणीही नाही, हे कृपया लक्षात घ्या. त्यांचे आई वडील, पालक हे कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत. त्यांना आपल्या मुलांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी तितकासा वेळ नाही, किंबहुना त्यांना त्याचं फारसं महत्त्वही नाही. लेकरू घरी बसलं तर कुठल्या तरी कामाला येईल अशा समस्यांमध्ये हे पालक असतात. उलट त्याचा घरच्या कामासाठी हातभार कसा लागेल हेही त्यांना आनंददायी वाटत असतं. त्यांच्याही मनात शिक्षणाबद्दल जागृती निर्माण करणं, पाल्याचे शिक्षण थांबू न देणं, त्याच्या शिकण्याच्या आनंदात खंड न पडू देणं हे आपलं काम मला ठाऊक आहे. अक्षर परिवार खऱ्या अर्थाने ही विद्यार्थ्यांच्याप्रति असणारी शैक्षणिक बांधिलकी बाळगणारा परिवार आहे. आपल्या परिवारातील सगळीच मंडळी अत्यंत उपक्रमशील तंत्रस्नेही आहेत. ही मंडळी समाजामध्ये शिक्षण आणि शाळा या दोन्हीमध्ये आपुलकी निर्माण करणारी खऱ्या अर्थानं समाजसेवी मंडळी आहे. मधल्या दोन महिन्यांमध्ये काही जणांनी उत्साहाने काम केलं. काहीजण मध्येच थांबले. मात्र फत्तेपुर शाळेच्या लर्निंग फॉर्म होम या उपक्रमांमध्ये कधीही खंड पडला नाही. याचा अर्थ असा नाही की आपण केलं नाही. केलं असेल कदाचित आपणही, ते आपल्या ग्रुप वरती दाखवलं नसेल, पण काही जण असेही आहेत की ज्यांनी एकही अक्षर किंवा एकही शब्द आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू दिला नाही, पोहोचवला नाही.
           जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे ही  तुकारामाची उक्ती आपण मोठ्या अभिमानाने सांगतो, वर्णन करतो, मात्र काहीजण या विचाराला जागले नाहीत, याबद्दल माझ्या मनामध्ये खूप खंत आहे. असेही नाही की हा उल्लेख करून मी आपल्याबद्दल माझी नापसंती कळवतो आहे, पण मी आपल्याला जाणीव करून देऊ इच्छितो, की ज्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आपण काम करतो, आपला पेशा ही केवळ नोकरी नसून एक बांधिलकी आहे, त्या बांधिलकीपोटी आपण आपल्या आयुष्यातला थोडातरी वेळ त्या मुलांसाठी, मुलांच्या शिकण्यासाठी द्यायला हवा. असे कुणीतरी असेल का ज्यांनी लॉकडाऊनमध्ये एकदाही व्हाट्सअप बघितलं नाही, एकदाही आपल्या घराचा उंबरठा ओलांडला नाही, नाही ना?नक्कीच आपण घराच्या बाहेर गेलो असेल. आपल्या फोन मध्ये असंख्य प्रकारचे व्हाट्सअप ग्रुप असतात, ते आपण पाहिले असतील, त्याला उत्तरही दिले असतील. आवडलेल्या पोस्ट फॉरवर्ड केल्या असतील. पण काही जणांनी या काळात एकही विद्यार्थी हिताची पोस्ट केली नाही. अनेकदा सांगूनही अनावश्यक आणि कोरोनाबाबतीत मात्र अतिउत्साहानं सहभाग घेतला! शासन वारंवार सांगत असताना, की घराबाहेर पडू नका, काही अपवाद वगळले तर प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कामासाठी घराबाहेर पडलाय. दूध आणायला, भाजीपाला आणायला, किराणा आणायला, आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारं सामान आणायला, दवाखान्यात जायला, प्रसंगी कुणी आपल्या गावाकडेही गेलेला आहे. प्रसंगी शहर सोडून इतर गावाला गेला आहे. या छोट्या मोठ्या कामांसाठी आपण कधी पायी घराबाहेर पडलो, कधी मोटरसायकलवर पडलो, तर कधी कारने आपण दूरवरचा प्रवासही केलेला आहे. याचा अर्थ असा की आपण कोणीही कोरोनाला घाबरत नाही, म्हणजे मला असं म्हणायचं नाही की आपण बाहेर पडत नाही म्हणून आता बाहेर पडा आणि शाळेला जा. इतकंच म्हणायचं, की आपण जसं इतर कामं करताना कोरोनाला घाबरलो नाही,  काळजी घेऊन आपण ही सगळी कामं केली, तसेच आताही काळजी घेऊन आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी काम करायचं आहे. मला वाटतं आपण हे कुणीही अमान्य करणार नाही. लर्निंग फ्रॉम होम मध्ये आपण स्वतंत्रपणे एक ग्रुप तयार केला, तंत्रस्नेही अक्षर परिवार. खरंच कौतुक वाटतं तुम्हा सर्वांचं. या ग्रुपमधील साऱ्यांनीच तंत्र कौशल्य आत्मसात केलं आहे. ते आत्मसात करून नवनव्या चाचण्या केल्या, प्रश्नावल्या केल्या, विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीचं अध्ययन साहित्य आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. ठीक आहे, सगळ्यांकडूनच आपल्याला प्रतिसाद हवा तसा मिळाला नसेल, पण काही पालकांनी, काही विद्यार्थ्यांनी कौतुक वाटावं इतका छान प्रतिसाद आपल्याला दिला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा दिलीप पाटील, माजी शिक्षण सभापती मा शिवराज पाटील आणि मान्यवर पदाधिकारी, पूर्व शिक्षण संचालक मा. गोविंद नांदेडे, शिक्षणाधिकारी मा. प्रशांत दिग्रसकर, गटशिक्षणाधिकारी मा. रुस्तुम आडे आणि जिल्हा पातळीवर शिक्षणातील सर्वोच्च असणाऱ्या, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेनेही आपल्या धडपडीची नोंद घेतली.  एखादं काम जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा ते काम करण्यासाठी जर आपण शंभर टक्के प्रयत्न केले तर किमान ७० ते ८० टक्के यश येऊ शकतं. या उपक्रमाचं तसंच आहे. १००% मनापासून प्रयत्न केले असतील तर आपल्याला काही प्रमाणात का होईना त्याचे यश मिळालं असेल. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं हे कधीही चांगलं, हे आपणालाही पटेल. या तंत्रस्नेही अक्षर परिवार मध्ये खूप छान पुढाकार घेतला तो साधना बेंद्रे, रूपाली गोजवडकर, सीमा बोबडे,अक्षय ढोके आणि युसुफ यांनी. आपण स्वतंत्र ब्लॉग तयार केला आणि सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टींची तयारी केली. साधना बेंद्रे यांनी पुढाकार घेऊन युट्युब चॅनल तयार केले. जगजित ठाकुरांनी मुलांना दररोज प्रशस्तीपत्र देऊन ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. बेबीसरोजा परबत, सपना शिंदे आदींनी नवं तंत्रज्ञान आत्मसात करून प्रश्नावली विकसित केलेल्या! काय हरकत नाही, सुट्टीचा कालावधी होता, तरी तो आपण आपल्या घरात बसून, आपला वेळ सत्कारणी लागावा म्हणून आपण विद्यार्थ्यांसाठी वापरला. मला आपल्या साऱ्याबद्दल मनापासून अभिमान वाटतो. तुमच्यासारखी अशी उपक्रमशील, सद्गुणी मंडळी प्रत्येक शाळेमध्ये एक जरी असली ना, तर त्या शाळेचा कायापालट होऊन जातो. मागे आपल्या बशीर सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी म्हणालो होतो, की 'कायापालट'या शब्दाचा समानार्थी शब्द मला जर कुणी विचारला, तर मी बिनदिक्कतपणे सांगेल ‘बशीर पठाण'. कायापालट काय असतो? ते तुम्ही आम्ही सर्वांनीच फत्तेपुरच्या रूपात बघितला आहे. आपणही आपल्या परीने खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. एखाद-दुसरा अपवाद वगळता आपल्या केंद्रातील संपूर्ण शाळा अत्यंत चांगल्या म्हणाव्या अशा आहेत, प्रत्येकाला आदर वाटावा अशा आहेत. मला एवढेच सांगायचेय, १५ जून हा शाळेचं अंगण फुलून येण्याचा दिवस, उत्सव असायचा हा दिवस म्हणजे, नवागतांचे स्वागत, रांगोळ्या, फुलं, तोरण, पाठ्यपुस्तकं, पालकांचा सहभाग, सगळा उत्साही दिवस. त्या नव्या मुलांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांमध्ये एक उत्सुकता असायची. नव्या जगण्याच्या प्रारंभाची. तुम्हाला भेटण्याची. नाचण्याची, बघण्याची, गाण्याची. काहीतरी नवनिर्माण करण्याची. हे सगळं सगळं आता थांबलं आहे. तुम्हा सर्वांना माझं एकच आवाहन आहे. भले मुलं शाळेपर्यंत येऊ शकत नाहीत आणि कदाचित तुम्हीही शाळेपर्यंत जाऊ शकत नाहीत. पण या नव्या तंत्राच्या माध्यमातून तुम्ही शंभर टक्के मुलांपर्यंत पोहोचू शकता किंवा ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, त्यांच्या वडिलांकडे त्यांच्यापर्यंत तरी नक्कीच जाऊ शकता. आणि आज घडीला शंभरातल्या किमान नव्वद पंच्याण्णव व्यक्तींकडे स्मार्ट फोन आहे. मग तो कोणता का असेना पण आहे.‌बऱ्याच जणांनी या मधल्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले, आपापल्या वर्गांचे.  सातत्याने त्यामध्ये कामही केलं. काही लोकांचा मध्ये खंड पडला. आता हे मात्र नव्या जोमाने सुरू करायचं आहे. ज्यांनी अजूनही आपल्या पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले नाहीत त्यांनी तात्काळ तयार करावेत. आपला वेळ या कामासाठी पूर्ण दिवस खर्ची घालावा. पालकांचे नंबर मिळवून घ्यावे. ते कसे मिळवायचे हा निर्णय तुमचा. फोन करून मिळवा. गावातला तुमचा कोणी संपर्क असेल, कुणाचा चांगल्या व्यक्तीचा किंवा शाळेबद्दल आस्था असणाऱ्या व्यक्तींचा अशांशी संपर्क करून त्यांचे फोन नंबर मिळवा. त्यांना फोनवर बोला. हे नियोजन सांगा. पण नव्या जोमाने या कामाला लागावे अशी माझी इच्छा आहे. शिक्षण कधीच थांबत नाही. शिकणं ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही शिकवलं नाहीत म्हणून ती मुलं शिकत नाहीत असं नाही. निसर्गाकडून ते शिकतात. आजूबाजूच्या माणसांकडून ते शिकतात. झाडांकडून, पाण्याकडून, पक्ष्यांकडून शिकत राहतात ते. फक्त त्यांना अंकात आणि अक्षरात शिकवणारं फारसं कोणी भेटणार नाही. असेल एखाद दुसऱ्याच्या घरामध्ये कोणी वडील, भाऊ, बहीण शिकलेली. असेल एखादा पालक खूप आस्था असणारा, लेकराच्या शिक्षणाबद्दलची, तरीही त्यांचं शिकणं पूर्ण होतच नाही. कोणीही नाही अशा लेकरांसाठी फक्त तुम्ही आहात आणि मला विश्वास आहे, की तुम्ही त्यांचं शिकणं थांबवणार नाही. कारण त्यांना शिकवत शिकवत तुम्ही ह्या सगळ्या नव्या गोष्टी शिकत राहणार आहात. आणि शिकणं हे कधीही माणसाचं नुकसान करणारं नसतं. भले काहीही शिकणं असो, एखादी कला असेल, एखादे तंत्र असेल की एखादा विषय. असेल एखादं सूत्र, गणित असेल, एखादा प्रसन्न करणारा अनुभव असेल. काहीही कुठलीही माहिती नव्याने आपल्या मेंदूमध्ये साचत जाते. ती योग्य वेळी आपणाला संकटामध्ये सारथ्य करत असते. तुमच्याही शिकण्याला आणि मुलांच्या शिकण्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. काही विद्वान ऑनलाईन शिक्षणाचे धोके सांगतायत. आपणही डोळे झाकून अशा पोस्ट पुढे धाडताहोत. घरातील मुलं जेव्हा तासनतास मोबाईलवर गेम खेळतात तेव्हा हा धोका दिसत नाही? हा वेगळा मुद्दा आहे.आपण मुलं थकणार कंटाळणार नाहीत ही काळजी घेऊन हे करायचे आहे.
           आपण नक्कीच आजपासून नव्या तयारीने या कामाला लागाल असा मला विश्वास आहे.पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद...
                                                                                                  व्यंकटेश चौधरी
शिक्षण विस्तार अधिकारी
                                                                                                   बिट वाजेगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा