मंगळवार, २८ जुलै, २०२०

अक्षर परिवार आम्ही नितळी (लेखक : अक्षय ढोके जि. प.प्रा. शा नागापूर, चलभाष ७७०९४६४३०७) वाजेगाव बीटमधील लर्निंग फ्राॅम होम_'शाळा बंद शिक्षण चालू' हा शासनाचा उपक्रम वाजेगाव विभागातील शिक्षकांनी सार्थ ठरवत संपूर्ण लॉकडाऊनच्या आणि नंतरच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित चालू ठेवले आहे... त्याविषयी...संपूर्ण जग कोरोना महामारीने ग्रस्त झाले आहे. जगभर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. या कोरोना आजारापासून बचाव होण्यासाठी विविध उपाय योजना केल्या गेल्या. यात प्रामुख्याने जनसंपर्क टाळता यावा यासाठी लॉकडाऊन हा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. भारतात बावीस मार्च पासून देशभर लॉकडाऊन करण्यात आला. संपूर्ण देश या काळात घरात कोंडल्या गेला. देशातील कारखाने, उद्योग, रेल्वे, बसेस या आणि अशा कित्येक सेवा बंद करण्यात आल्या. उत्पादन क्षेत्राबरोबरच सेवाक्षेत्र ज्यात प्रामुख्याने शिक्षणाचा अंतर्भाव होतो, तेही बंद करावे लागले. कालांतराने हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्यात आले. यामध्ये नागरिकांना सामाजिक अंतर ठेऊन राहणीमान बदलण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेने दिले. अशा आरोग्यदायक दिशानिर्देश यांचे पालन करण्याची अट घालून शासनाने देशाचे अर्थचक्र पुन्हा सुरू केले. परंतु देशातील सर्वात महत्त्वाचे संसाधन म्हणजेच प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करणारे क्षेत्र शिक्षण क्षेत्र मात्र सुरू करता आले नाही. शिक्षण क्षेत्र सुरू न करू शकणारी कारणेही तशीच असहाय्य होती. सर्वात महत्त्वाचे विद्यार्थी संख्या इतकी जास्त आहे की शारीरिक अंतर ठेवणे अशक्य होते.तसेच लहान विद्यार्थी हे स्वच्छतेचे जे दिशा निर्देश दिले आहेत ते पाळणे कठीण होते. शिवाय लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे सर्वज्ञात असल्याने शासन तसेच पालकही शाळा सुरू करण्याचा धोका पत्करू इच्छित नव्हते.त्यामुळे सुरुवातीच्या काळात शाळा आणि पर्यायाने शिक्षण बंद ठेवावे लागले. विना परीक्षा विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेशित करण्यात आले. यातच नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली. शिक्षण बंद ठेवणे अशक्य होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाच्या चौकटीत कायम ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने ‘शाळा बंद पण अभ्यास सुरू’ अशी मोहीम आखली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून शिकवण्यात यावे, यासंदर्भातील परिपत्रके, मार्गदर्शक सूचना शासनाने प्रसारित केल्या. यासाठी ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन सुरू केले. मात्र, हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी साधनांची पुरेशी उपलब्धता नसल्याचे दिसत आहे. राज्यात ॲक्टिव टीचर्स फोरमच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणातून राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या ३७ टक्के पालकांकडे स्मार्टफोन असून यातील अवघ्या २० टक्के मुलांच्या पालकांच्या स्मार्टफोनला इंटरनेट सुविधा असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा परिषदेसह विविध व्यवस्थापनांच्या एकूण ११८६ शाळांमधील शिक्षकांच्या माध्यमातून एक लाख ६७ हजार ६८७ मुलांविषयीची माहिती अभ्यासण्यात आली. यापैकी ४५ टक्के पालकांकडे स्मार्टफोन असले तरी केवळ २७ टक्के पालकांकडे इंटरनेटची जोडणी आहे. त्यामुळे इंटरनेट सुविधा नसलेल्या ‘ऑफलाइन’ मुलांच्या अभ्यासाचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. ‘ॲक्टिव्ह टीचर्स फोरम’(एटीएफ) या शिक्षक गटाने केलेले ‘डिजिटल ॲक्सेस’ हे राज्यस्तरीय सर्वेक्षण कोरोना संकटकाळात बालकांच्या शिक्षण हक्काचा विचार ‘डिजिटलेतर पद्धतीने’ करावा लागेल, असे सुचवते. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रेरित केले. याचाच परिपाक म्हणून सबंध नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच काही ठिकाणी खासगी शाळांमधील ही शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले आहे. यातही नवोपक्रमाची जननी असलेले वाजेगाव बीट आपल्या विशेष प्रयत्नांनी वेगळा ठसा उमटविताना दिसत आहे. १ मे रोजी महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचे राज्याचे पहिले वेबिनॉर झाल्यानंतर वाजेगाव बीटचे विद्यार्थीशिक्षणाविषयी विशेष आस्था बाळगणारे संवेदनशील विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी ४ मे रोजी बीटमधील सर्वच मुख्याध्यापक, शिक्षक यांची वेबीनार बैठक घेऊन शिक्षकांच्या मनातील कोरोना संसर्गाच्या भीतीपेक्षाही आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याशिवाय कोणीच नाही ही भावना अधिक बळकट केली. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी, इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मिळत असणारे ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी मुख्याध्यापक यांना ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यावे याचे प्रशिक्षण वजा मार्गदर्शन शारीरिक अंतर ठेऊन प्रत्यक्ष बैठकीत दिले. यात केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी मोलाची भूमिका बजावली. यापासून प्रेरणा घेऊन बीट मधील सर्वच शिक्षक झपाट्याने कामाला लागले. आणि सुटीच्या दिवसांतही वाजेगाव बीटमध्ये लर्निंग फ्राॅम होम सुरू झाले. बीटमधील ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आवश्यक असणारे टेस्ट, व्हिडिओ, पीडीएफ, डिजिटल शैक्षणिक साहित्य, ब्लॉग, यू ट्यूब चॅनल यांची निर्मिती करण्यासाठी सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे असणारे केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाढे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या सूचनेनुसार तंत्रस्नेही शिक्षकांचा व्हॉटसअप ग्रुप तयार केला. या तंत्रस्नेही शिक्षकांचेही व्यंकटेश चौधरी यांनी वेबिनॉर घेऊन ऑनलॉईन शिक्षणाबाबत दिशा आणि प्रेरणा दिली. बिटचा ब्लॉग आणि युट्युब चॅनल तयार करण्यात आले. केंद्रातील इतर सेवाज्येष्ठ शिक्षकांनीही त्यांचा आदर्श घेत शिक्षण क्षेत्रातील या मूलभूत बदलाशी जुळवून घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बेबिसरोजा परबत, शोभा बकवाड या ज्येष्ठ शिक्षिकांनीही ऑनलाईन टेस्ट तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. यानंतर तर बीटमध्ये जणू काही सकारात्मक स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक जण आपापल्या परीने विद्यार्थी शिक्षणासाठी नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञानाचा वापर करू लागला. सीमा देवरे, रूपाली गोजवडकर, युसुफ पठाण, मुदस्सर अहेमद, गणेश कहाळेकर, रूपाली पांपटवार, रामेश्वर आळंदे, तृप्ती आटीपामलू, संगमनाथ पांचाळ, रूपेश गाडेवाड, अश्विनी गोडीगवार, अरुणा कलेपवार, श्रीराम मोगले, मेघा पोलावार, प्रणिता अकोशे, राजू राठोड, सपना शिंदे, जगजितसिंह ठाकूर, सारंग स्वामी, मीना केंद्रे, सादीया अंजुम, गणपत मुंडकर, धम्मदिना सोनकांबळे, साधना बेंद्रे,अक्षय ढोके इत्यादी शिक्षकांनी विविध ऑनलाईन टेस्ट, शैक्षणिक व्हिडिओ, फ्लीपबुक, घटकनिहाय कार्टून स्वरूपातील रंजक व्हिडिओ, कोण ठरणार बुद्धिमान? यासारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण नेण्याचे कार्य अविरत सुरू ठेवले. बीटच्या तंत्रस्नेही ग्रुपवरील संप्रेषण, मार्गदर्शन आणि विचारमंथन यातून नव्या जोमाने सर्वांनी नवे कौशल्य आत्मसात केले. बीटमधील सर्व शिक्षकांनी वर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉटसअप ग्रुप तयार करून त्यावर दैनंदिन अभ्यास देण्याचे नियोजन केले आहे. तसे मासिक नियोजनच त्यांनी मुख्याध्यापकांना सादर केले आहे. विविध ॲपचा वापर करून आपल्या पाल्यांना कसे शिक्षण देता येईल, याची माहिती सर्व पालकांना शिक्षक देत आहेत. यातून विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो आहे. विविध कविता, पाठ्यघटक, अभ्यासक्रम समजून घेणे याने सुलभ झाले आहे. ऑनलाईन शिक्षण अगदी प्रभावीपणे वाजेगाव बीट मध्ये सर्वांच्या संघटित प्रयत्नांनी राबविण्यात येत आहे. सोबतच शासन स्तरावरील टीव्हीवरील टीलिमिली सारखे शैक्षणिक प्रयोग यांची माहिती प्रत्येक पालकांपर्यंत शिक्षक पोहचावीत आहेत. विद्यार्थी हे कार्यक्रम पाहतील याचे नियोजन शिक्षक करीत आहेत. पालकांचाही खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. डायटचे प्राचार्य मा. डॉ. जयश्री आठवले यांनीही याची नोंद घेतली आहे. तरीही ऑनलाईन शिक्षणाची मर्यादा, ग्रामीण पालकांची स्मार्टफोन विकत घेणे, त्याला नेट चे रिचार्ज करणे यातील आर्थिक असमर्थता लक्षात घेऊन ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देता येत नव्हते अशांसाठी ही वाजेगाव बीट मधील शिक्षकांनी निराळी वाट चोखाळली. ज्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाची मात्रा कामाला येत नाही त्या ठिकाणी येथील शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन अभ्यास देणे, तपासणे यासारखे धारिष्ट्यपूर्ण पाऊल उचलत आहेत. शिक्षक विद्यार्थी जिथे राहतात तिथे जाऊन, प्रसंगी ज्यांची घरे शेतात, मळ्यात आहेत तिथे जाऊन त्यांना अभ्यास देण्याचे तसेच दिलेला अभ्यास नियमित तपासण्याचे काम करत आहेत. लक्ष्मी गायकवाड, संगीता कदम, शोभा माळवतकर, बालाजी कपाळे, गंगाधर हणमंते, सायलू मंकोड, वैजयंता पाठक, लता शिवाजी, रामराव देशमुख, विश्वनाथ व्होळगे, भारत देशमुख, अजित कदम, विजय गादेवार, दत्तप्रसाद पांडागळे, बाबुराव सूर्यवंशी यांनी घरोघरी जाऊन ऑफलाईन औपचारिक शिक्षण वंचित विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावीत आहेत. लॉकडाउनच्या या अडचणीच्या काळातही संधी शोधणारे पदोन्नत मुख्याध्यापक सटवाजी माचनवार, तुकाराम जाधव तसेच केंद्रातील विद्यार्थी समर्पित मुख्याध्यापक बशीर पठाण यांनी या काळात शाळेचे रुपडेच पालटले. त्यांनी या काळात शाळा दुरुस्ती, रंगरंगोटी, वृक्षारोपण, शालेय परिसर स्वच्छता यासारखी कामे करून संधीचे सोने केले. बशीर पठाण तर अगदी दिवसरात्र शाळेतच आहेत. त्यांनी गावातील तरुण सुशिक्षित मुलांना शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे नियोजन केले. ज्याचे तंतोतंत पालन ही युवक मंडळी करत आहेत. उन्हाळी सुट्टीत सुद्धा गावकऱ्यांनी शाळेतील बाग हिरवीजर्द ठेवली. एकंदर शाळा नाही पण शिक्षण आहे ही संकल्पना खऱ्या अर्थाने शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे पवित्र कार्य वाजेगाव बीटमध्ये होताना दिसत आहे. शिक्षणाधिकारी मा. प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी मा. डॉ. दत्तात्रय मठपती, मा. बंडू आमदूरकर, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे हेदेखील बीटमध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक चळवळीची वेळोवेळी नोंद घेऊन खूप प्रोत्साहन देत आहेत. मा. शिक्षणाधिकारी यांनी वाजेगाव विभागातील कोरोना काळातील शिक्षकांची धडपड मा. शिक्षण आयुक्तांपर्यंत पोहचविली आहे. पालक वर्गही शिक्षकांच्या या प्रयत्नांवर समाधान व्यक्त करत आहेत. आमची प्रेरणा शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांचा सतत पाठपुरावा, संवाद, नव्या संकल्पना, हरेक धडपडीला सातत्याने कौतुकानं नोंद घेणं हा या साऱ्या प्रयत्नांचा जणू आत्माच आहे. आम्ही करतोय ते शंभर टक्के बरोबर आहेच किंवा शंभर टक्के मुलांचं शिक्षण पूर्ण होतंय हे कदाचित सांगता यायचं नाही, मात्र आम्ही शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे आम्ही नितळीच्या भूमिकेतून हे करीत असल्याने या प्रयत्नांचं फलितही मोलाचं आहे, समाधान देणारं आहे, हे नक्की........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा